बोगस डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान ठरले असून ते सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी 'महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन'कडून (एमसीआयएम) डॉक्टरांची नोंद करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी 'एमसीआयएम तत्पर' अॅप बनवले आहे. पालघरमध्ये अॅपची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू आहे. राज्यव्यापी नोंदणी नूतनीकरणाच्या प्रक्रियेला एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर राज्यातील बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.
बोगस डॉक्टरांकडून वेदनाशामक, स्टेरॉईड, अॅण्टीबायोटिक औषधांचा गैरवापर केल्याने रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे एमसीआयएमने डॉक्टरांची नोंदणी नूतनीकरण प्रक्रिया सुधारित पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय 1961 नुसार दर पाच वर्षांनी डॉक्टरांना नोंदणीचे नूतनीकरण बंधनकारक आहे. नोंदणीशिवाय प्रॅक्टिस करणार्याला कायद्याच्या परिभाषेत बोगस डॉक्टर समजण्यात येते. यापूर्वी नोंदणी प्रक्रिया क्लिष्ट असल्याने डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागायचा. त्यामुळे एमसीआयएमने डॉक्टरांच्या नोंदणीचा निर्णय घेत 'एमसीआयएम तत्पर' अॅण्ड्राईड, आयओएस वेबबेस अॅप तयार केले.
यामध्ये डॉक्टरांनी नूतनीकरण अर्जासह आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट केल्यावर कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र, माहिती पुस्तिका व क्यूआर कोड मिळेल. कागदपत्रांची तपासणी परिषद आणि विद्यापीठाकडील माहितीच्या आधारे होणार आहे. नोंदणी न करणार्या डॉक्टरांकडून एमसीआयएम कागदपत्रे मागवण्यात येणार आहेत. त्यानंतरही कागदपत्रे सादर न करणारे, संशयास्पद नोंदणी व पडताळणीत बोगस आढळणार्यांवर कठोर कारवाई होणार आहे, अशी माहिती एमसीआयएमचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीमुळेच ही प्रक्रिया राबवणे शक्य झाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
प्रस्तावित 'नो यूवर डॉक्टर' अॅप
नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर क्यूआर कोड असणार आहे. डॉक्टरांनी प्रॅक्टिसच्या ठिकाणी तसेच व्हिजिटींगवेळी बॅगेमध्ये प्रमाणपत्र लावणे बंधनकारक आहे. डॉक्टरांची ओळख पटवण्यासाठी सर्वसामान्यांसाठी 'नो यूवर डॉक्टर' अॅप बनवण्यात येणार आहे. हे अॅप तयार झाल्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सर्वसामान्यांना डॉक्टरचे नाव, शिक्षण, फोटो, प्रॅक्टिसचा प्रकार, स्पेशालिटी ही माहिती मिळेल. त्यामुळे नागरिकांना बोगस व खरा डॉक्टर यांची ओळख पटण्यास मदत होईल.
नोंदणी शुल्क फक्त दोन हजार
डॉक्टरांना नोंदणीसाठी दोन हजार शुल्क आकारले आहे. यामध्ये डॉक्टरांना प्रमाणपत्र, ओळखपत्र, क्युआर कोड, माहिती पुस्तिका, भारत सरकारच्या अधिकृत डिजी लॉकरमध्ये नोंदणी, पत्त्यामधील बदल, महिला डॉक्टरांसाठी लग्नांनतर नावातील बदल अशा सुविधा मिळणार आहेत.
२० सिक्युरिटीयुक्त सर्टिफिकेट
बनावट प्रमाणपत्र बनवता येऊ नये यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांना 20 सिक्युरिटीयुक्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये मुद्रण सुरक्षेच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानांकनांची अंमलबजावणी केली आहे. डोळ्यांनी न दिसणार्या पण यंत्राने पहाव्या लागतील, अशा बाबींचा यात समावेश आहे.
बोगस डॉक्टर कोण
- बनावट दस्तऐवजांच्या आधारे परिषदेमध्ये नोंदणी केलेले डॉक्टर
- नोंदणीकृत डॉक्टरांच्या नावावर प्रॅक्टिस करणारी व्यक्ती
- बनावट नोंदणीच्या आधारे नोंदणी करणारे
- नोंदणीकृत डॉक्टरच्या कागदपत्रावरून बनावट कागदपत्रे बनवून प्रॅक्टिस करणारे
काय असणार माहिती पुस्तिकेत
नोंदणीकृत डॉक्टरला देण्यात येणार्या पुस्तिकेमध्ये वैद्यकीय कायदे, डॉक्टरांनी घ्यावयाची काळजी, रुग्णांना कशापद्धतीने प्रमाणपत्र द्यायचे, काय करावे व काय करू नये, वैद्यकीय नीतीमत्ता यांचा समावेश आहे.
राज्यात १०० केंद्रे उभारणार
नोंदणीनंतर डॉक्टरांची ओळख पटवण्यासाठी व सर्टिफिकेट देण्यासाठी राज्यात जिल्हा व तालुका स्तरावर 100 केंद्रे उभारण्यात येणार आहेत. केंद्रावर सर्टिफिकेट पोहोचल्यानंतर अॅपवरून वेळ घ्यायची. केंद्रावर मोबाईल ओटीपीच्या साहाय्याने मूळ कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करून डॉक्टरांचे जुने सर्टिफिकेट जमा करून फोटो असलेले सर्टिफिकेट मिळेल.
'महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन'कडून (एमसीआयएम) डॉक्टरांची नोंद करण्यात येणार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 23, 2019
Rating:
No comments: