Seo Services
Seo Services

चालू घडामोडी व दिनविशेष - २२ मार्च २०१९




'सबांग'मुळे भारत होणार 'दबंग'; चीनच्या मनसुब्याला लावणार सुरुंग  :

जकार्ता : घुसखोरी करणाऱ्या चीनला टक्कर देण्यासाठी भारताने नवा मार्ग शोधला आहे. यासाठी इंडोनेशियासोबत मिळून बंदराची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. यामुळे चीनच्या बेल्ट अँण्ड रोड इनिशटिव्ह (बीआरआय) प्रोजक्टला टक्कर देता येऊ शकेल. या प्रोजक्टमुळे चीन हिंद महासागरात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

इंडोनेशियासोबत मिळून भारत सबांग बंदराची निर्मिती करत आहे. यामुळे मुख्यत: भारताला दोन फायदे होणार आहेत. एक म्हणजे, साऊथ ईस्ट एशियाच्या बाजारापर्यंत भारत पोहचू शकतो. तसेच, सैनिकी डावपेच यासाठी भारताला याचा प्लस पॉइंट मिळेल.  

लुक ईस्ट पॉलिसीचा अर्थ बदलला - पी. व्ही. नरसिम्हा राव यांचे सरकार असल्यापासून ते आत्तापर्यंत पूर्वेकडील क्षेत्र व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजले जाते. आसियान देशांसोबत सुद्धा याच्याशी संबंध केंद्रित आहेत. मात्र, हिंद महासागरात चीन आपला दबदबा निर्माण करण्यासाठी रणनीतीने काम करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लुक ईस्ट पॉलिसीच्या अँक्ट ईस्टमध्ये बदल केला आहे.  

चीनला रोखने सोपे नाही, मात्र गरजेचे आहे. भारत आणि चीनमधील संबंध वेगवेगळ्या मुद्द्यावर भिन्न-भिन्न आहेत. त्यामुळे चीनला प्रतिकार करणे गरजेचे आहे. मात्र, ते इतके सोपे नाही. खरंतर, आसियानमध्ये चीन सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. 2008 मध्ये चीनची गुंतवणूक जवळपास 192 बिलियन डॉलर इतकी होती. त्यामध्ये 2018 साली वाढ होऊन 515 कोटी डॉलर झाली. 

भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा :

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांवर लवकरात लवकर गंभीर कारवाई करा, असंही अमेरिकेनं पाकला सांगितलं आहे. भारतावर आणखी एका दहशतवादी हल्ल्याचा तुम्ही विचार जरी केलात, तर तुमच्या प्रचंड अडचणी वाढतील, असे खडे बोल अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावले आहेत. व्हाइट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची गरज आहे.

पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाविरोधात कारवाईची करण्याची आवश्यकता आहे. जर पाकिस्ताननं दहशतवादावर कारवाई केली नाही आणि भारतावर आणखी एक हल्ला झाल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकते.

भारतानं पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्ताननं काही कारवाई केली आहे.

काही दहशतवाद्यांची संपत्ती जप्त केली आहे, तर काहींना अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या काही सुविधांवरही पाकिस्ताननं निर्बंध आणले आहेत. परंतु एवढ्यावरच न थांबता पाकिस्ताननं आणखी आक्रमक कारवाई करावी, असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. 

‘भारत आर्मी’ देणार विराटसेनेला पाठिंबा :

लंडन : इंग्लंड संघाला जगभरातील कोणत्याही ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी हजर असणाऱ्या ‘बार्मी आर्मी’च्या धर्तीवर ‘भारत आर्मी’ची स्थापना करण्यात आली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी जवळपास २२ देशांमधून ‘भारत आर्मी’चे आठ हजार चाहते इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली.

१९९९मध्ये इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अवघ्या चार चाहत्यांनी मिळून  ‘भारत आर्मी’ची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यात असंख्य चाहत्यांची भर पडली असून विश्वचषकातील भारताच्या प्रत्येक सामन्याला पाच ते सहा हजार चाहत्यांची उपस्थिती असणार आहे.

‘‘भारत आर्मी या चाहत्यांच्या समूहाचा जगभरातील विस्तार वाढत असून ब्रिटन, भारत, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिकेत आमचे असंख्य चाहते आहेत. प्रतिष्ठेच्या स्पर्धामधील भारतीय संघाच्या सामन्यांना हजर राहण्याची बहुसंख्य चाहत्यांची मागणी असल्यामुळे आम्ही २०१५ मध्ये ‘भारत आर्मी ट्रॅव्हल्स’ची स्थापना केली आहे,’’ असे राकेश पटेल या एका संस्थापकाने सांगितले.

महाडची मुक्ता वारंगे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिकाने सन्मानित :

महाडमधील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पा.म.थरवळ कन्या विद्यालयामध्ये इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारी मुक्ता राहूल वारंगे यां विद्यार्थिनीला राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक म्हणुन नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञनिक स्पर्धेत कुमारी मुक्ताने यश मिळविले.

त्याचप्रमाणे येथील परांजपे विद्या मंदिरातील अमेय शिवाजी यादव इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाला देखील बाल वैज्ञानिक म्हणून सन्मानित करण्यात आले. वरील दोन्ही विद्यार्थ्यांचे महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन तर्फे सन १९८१ पासून डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा चार टप्प्यामध्ये घेण्यात येते. पहिला टप्पा लेखी परिक्षेचा असून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रात्यक्षिक सादरीकरण असते. तिसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत घेण्यात आल्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये प्रकल्प तयार करुन त्याचे सादरीकरण करणे हे महत्त्वाचे असते.

अतिशय कठीण तसेच बुध्दीची चाचणी घेतल्यानंतर विद्यार्थाची बाल वैज्ञानिक म्हणून निवड केली जाते. या परिक्षेला या वर्षी संपुर्ण राज्यातून सुमारे ६० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. साठ हजार विद्यार्थ्यांपैकी ५१० विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली. या मध्ये महाडमधील कुमारी मुक्ता राहूल वारंगे आणि अमेय शिवाजी यादव यांचा समावेश असून या दोघांना सन्मानित करण्याात आले.

शेतमजुरी क्षेत्रातील रोजगारात ४० टक्क्यांनी घट :

नवी दिल्ली : शेतमजुरीच्या क्षेत्रातील रोजगारात २०११- १२ या वर्षांपासून सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली असून यामुळे गेल्या सात वर्षांत रोजगाराची संख्या सुमारे ३ कोटींनी कमी झाली आहे. हे नुकसान इतरत्र भरून निघण्याइतपत ग्रामीण भागातील रोजगाराच्या इतर कुठल्या क्षेत्रातही त्या प्रमाणात वाढ झालेली नाही.

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) २०१७-१८ या वर्षांसाठीच्या (अद्याप जाहीर न झालेल्या) पिरिऑडिक लेबर फोर्स सव्‍‌र्हे (पीएलएफएस) या अहवालात, शेतमजुरीतून प्रामुख्याने उत्पन्न मिळणाऱ्या ग्रामीण भागातील घरांच्या संख्येत २०११-१२ पासून २१ टक्क्यांपासून १२.१ टक्क्यांपर्यंत, म्हणजे १० टक्क्यांनी घट झाली आहे. म्हणजेच  शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या संख्येत दीड कोटींनी घट होऊन, ती ३६० दशलक्षवरून २१ दशलक्ष इतकी झाली आहे.

एनएसएसओच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण शेतमजुरीच्या क्षेत्रात २०११-१२ पासून पुरुषांच्या रोजगारात ७.३ टक्क्यांनी, तर महिलांच्या बाबतीत ३.३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. याचाच अर्थ, यापूर्वीच्या रोजगार सर्वेक्षणानंतर एकूण रोजगाराचे ३.२ कोटी रुपयांनी नुकसान झाले असून, ग्रामीण शेतमजुरीच्या क्षेत्रात २९.२ टक्क्यांची घट झाली आहे.

एनएसएसओच्या अहवालाला राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने डिसेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली असली, तरी सरकारने अद्याप तो जारी केलेला नाही. या अहवाल रोखून धरण्यात आल्याच्या निषेधार्थ प्रभारी अध्यक्ष पी.एन. मोहनन यांच्यासह आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. २०११-१२ साली शेतमजुरी करणाऱ्या पुरुषांची ३०.४ कोटी ही संख्या २०१७-१८ साली २८.६ कोटीपर्यंत घसरल्याचा अहवाल ‘इंडियन एक्सप्रेस’ ने पीएलएफएस २०१७-१८ आणि एनएसएसओची आकडेवारी यांच्या आधारे प्रकाशित केला होता.

महिला आयकर आयुक्तांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये प्रवेश :

मेरठ येथे कार्यरत असलेल्या आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रीता हरित या आयकर विभागात विशेष आयुक्तपदी कार्यरत होत्या.

बुधवारी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख राज बब्बर यांच्या उपस्थितीत प्रीता हरित यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. प्रीता यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. मुळच्या हरयाणाच्या असलेल्या प्रीता पूर्वीपासूनच दलितांच्या अधिकारांसाठी सक्रिय आहेत.

सामाजिक संघटनांच्या माध्यमातून दलितांना अधिकार मिळावा यासाठी अभियान सुरू करणाऱ्या प्रीता हरित नेहमी चर्चेत राहिलेल्या आहेत. १९८७ च्या बॅचच्या आयआरएस अधिकारी असलेल्या प्रीता हरित यांनी दनकौर येथे दलित महिलांवरील अत्याचारावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती. याप्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली होती.

पाकिस्तानी नागरिकांपेक्षा भारतीय जास्त उदास, संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल :

संयुक्त राष्ट्र संघाने आपला जागतिक आनंदी देशांचा अहवाल सादर केला असून या अहवालात यंदा भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. गतवर्षीपेक्षा भारत ७ क्रमांकांनी घसरला आहे. फिनलँड सलग दुसऱ्या वर्षी सर्वोच्च स्थानी कायम आहे. विशेष म्हणजे भारत आपला शेजारी देश पाकिस्तानपेक्षाही पिछाडीवर आहे. संयुक्त राष्ट्राने बुधवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला.

संयुक्त राष्ट्र महासभाने २०१२ मध्ये २० मार्च रोजी जागतिक आनंदी दिवस घोषित केला होता. संयुक्त राष्ट्र ही सूची ६ घटकांच्या आधारावर निश्चित करते. यामध्ये उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारतेचा समावेश आहे. या अहवालानुसार, मागील काही वर्शांत समग्र जागतिक आनंदात घसरण झाली आहे.

वर्ष २०१८ मध्ये यात भारत १३३ व्या स्थानी होता. तर यंदा तो १४० व्या क्रमांकावर आला आहे. संयुक्त राष्ट्राचा सातवा वार्षिक आंनदी देशांचा हा अहवाल जगातील १५६ देशांवर आधारित आहे. या देशातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात, यावर तो अवलंबून असतो. यामध्ये चिंता, उदासी आणि आणि क्रोधसहित नकारात्मक भावनांमध्ये वृद्धी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

फिनलँडला सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वांत आनंदी देश मानले गेले आहे. त्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडचे स्थान येते. या अहवालानुसार पाकिस्तान ६७ व्या स्थानी, चीन ९३ व्या स्थानी आणि बांगलादेश १२५ व्या स्थानी आहे. युद्धग्रस्त दक्षिण सुदान येथील नागरिक सर्वाधिक नाखूश आहेत. त्यानंतर मध्य अफ्रिकन गणराज्य (१५५), अफगाणिस्तान (१५४), टांझानिया (१५३) आणि रवांडा (१५२) यांचा क्रम येतो. जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक असलेला अमेरिका मात्र आनंदात १९ व्या स्थानी आहे.


दिनविशेष :
जागतिक जल दिन

महत्वाच्या घटना 

१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.

१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.

१९४५: अरब लीगची स्थापना झाली.

१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.

१९९९: लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला.

जन्म 

१७९७: जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८८८)

१९२४: यूए.एस.ए. टुडे चे स्थापक अल नेउहार्थ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)

१९३०: ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक पॅट रॉबर्टसन यांचा जन्म.

१९३३: इराण चे पहिले अध्यक्ष अबोलहसन बनीसद्र यांचा जन्म.

मृत्यू 

१८३२: जर्मन महाकवी आणि लेखक योहान वूल्फगाँग गटें यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९)

१९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.

२००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)
चालू घडामोडी व दिनविशेष - २२ मार्च २०१९ चालू घडामोडी व दिनविशेष - २२ मार्च २०१९ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 22, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.