पिंपरी : पिंपरी-चिंचवड
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये 29.93 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येत्या सोमवार (दि. 6) पासून
शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
पवना धरणामध्ये 1 मे 2018 रोजी 37.70 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी 1 मे 2019 रोजी मात्र हा पाणीसाठा केवळ 29.93 टक्के शिल्लक आहे. मागील वर्षी पावसाळ्यात परतीच्या
मान्सूनचा पाऊस न झाल्याने आता धरणात कमी पाणी आहे. जलसंपदा विभागाने पाणीकपात
करणेबाबत महानगरपालिकेस वारंवार कळविले आहे. जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार 1 मार्च पासून शहरामध्ये सर्व भागात वेगवेगळ्या
वेळी 'आठवड्यातून एक दिवस
पाणी बंद' या तत्वावर पाणीकपात सुरू करण्यात आली आहे.
पवना धरणातील पाणीसाठी 30 टक्क्यांच्या खाली आला आहे. उन्हाचे प्रमाण वाढल्याने
बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या पध्दतीने पाणीवापर सुरू ठेवल्यास धरणातील पाणी 30 जून पर्यंतच पुरणार आहे. उपलब्ध पाणी 30 जुलैपर्यंत पुरण्यासाठी दैनंदिन
पाणीपुरवठ्यामध्ये सर्वसाधारणपणे 25 ते 30 टक्के कपात करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरात दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये 25 टक्क्यांपेक्षा जास्त कपात केल्यास उंचावरील
भागात कमी पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे कपातीनंतर देखील सर्व नागरीकांना
व्यवस्थित पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्व शहराला 'एक दिवस आड पाणीपुरवठा' करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार (दि. 6) पासून होणार आहे. पाणीटंचाईची ही पार्श्वभूमी
लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, तसेच घरातील इमारतीमधील गळत्या बंद कराव्यात, सार्वजनिक ठिकाणांवरील गळत्यांविषयी महापालिकेस
कळवावे: असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात, "६ मेपासून पाणी कपात"
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 03, 2019
Rating:

No comments: